आज रविवारपासून दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कामे आटोपून घ्यावी, असा सल्लाही देण्यात आलाय.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या दक्षिण बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. उद्या म्हणजेच सोमवारपासून हे क्षेत्र आणखीच ठळक होणार आहे. परिणामी राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
दरम्यान, शनिवारी (ता. १७) राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चांगलाच चटका जाणवला. ब्रम्ह्यपुरे येथे सर्वाधिक ३४.६ अंश तापमानाची नोंद झाली. दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. आज पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने आज रविवारी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. याशिवाय अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूरमध्ये पाऊस पडू शकतो.
तिकडे सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.