गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंबीयात जवळीक वाढत असल्याचं दिसतंय. शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची केलेली पाठराखण असो वा एका घरगुती कार्यक्रमात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणं असो. महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद कायम उमटत असतात. काही दिवसांपूर्वी हे दोन्ही भाऊ एका घरगुती कार्यक्रमात एकत्र दिसले होते. त्यामुळे राजकारणातही हे दोघे एकत्र येणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावरून राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी एका शब्दांत प्रतिक्रिया दिली.
“माझ्या नंणदेच्या मुलाचा साखरपुडा होता. घरातील सर्व लोक अशावेळी एकत्र येतात. माझी नणंद राजकारणात नाहीय. राज जसा तिचा भाऊ आहे, तसा उद्धवही भाऊ आहे”, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. तसंच, उद्धव आणि राज एकत्र येणार का? असं विचारलं असता शर्मिला ठाकरे यांनी “बघुया…”, एवढंच एका शब्दात उत्तर दिलं.