राज्यात सध्या दोन समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याचं चित्र आहे. दोन समाजात सुरू असलेल्या आरक्षणाच्या वादावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या भूमिकेवर पक्ष ठाम असल्याचं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केलं आहे. तसेच आरक्षणाच्या वादात न पडण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यात राज ठाकरे यांनी देखील मनोज जरांगे त्यांची भेट घेतली होती. मात्र, अशा प्रकारचं कोणतंही आरक्षण कधीच मिळणार नाही हे स्वतः राज ठाकरे यांनी जरांगे यांना स्पष्ट सांगितलं होतं.
काही दिवसांपूर्वी जरांगे यांच्या मागे कोण आहे? कोण महाराष्ट्रातला जातीय सलोखा बिघडण्याचा प्रयत्न करतोय? याला निवडणुकांची तर पार्श्वभूमी नाही ना, असे अनेक प्रश्न स्वतः राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच उपस्थित केले होते मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही राज्यातील जवळजवळ सगळ्याच राजकीय पक्षांची मागणी आहे. मात्र आरक्षण आरक्षणासंदर्भात न्यायालयाने घातलेली मर्यादेमुळे गेली अनेक वर्ष हा अनुत्तरितच राहिला आहे.
आरक्षणासंदर्भात राज ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका कायमच आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची राहिली आहे, तसेच आजही पक्ष या भूमिकेवर ठाम असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. लवकरच आरक्षणासंदर्भात तसेच महाराष्ट्रातील बिघडत्या जातीय सलोख्या संदर्भात राज ठाकरे सविस्तर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे.