मी भाजपाला पाठिंबा दिला, तो केवळ लोकसभेसाठी होता. त्यावेळी मी विधानसभेचं काही बोललो नव्हतो, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे २२५ ते २५० जागा लढवेन, असंदेखील त्यांनी सांगितले.
राज ठाकरे हे आज सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना लोकसभेप्रमाणेच विधानसभा निडणुकीतही भाजपाबरोबर युती होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना मी भाजपाला पाठिंबा, केवळ लोकसभेसाठी दिला होता. त्यावेळी मी विधानसभेचं काहीही बोललो नव्हतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मी लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यावेळी मी स्पष्ट सांगिलतं होतं, की मी हा पाठिंबा केवळ नरेंद्र मोदी यांना देतो आहे. तेव्हा मी विधानसभेच्या पाठिंब्याचं कुठंही बोललो नव्हतो. त्यामुळे आता युतीचा विषय नाही, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे २२५ ते २५० जागा लढवेन, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातील मुलांना शिक्षण आणि नोकरी मिळाली पाहिजे, यात जात येते कुठं. महाराष्ट्रात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण होतात. खासगी शिक्षण संस्था आणि नोकऱ्यात आरक्षण नाही. मग किती जागांवर आरक्षण आहे. हे बघणंही गरजेचं आहे. मुळात सध्या माथी भडकवून राजकारण करण्याचं प्रयत्न सुरू आहे. हे फक्त मतांचं राजकारण आहे. प्रत्येकाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. यातून हाताला काहीही लागणार नाही, असे ते म्हणाले.