गोरेगाव येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पण संध्याकाळी अचानक पावसाने सुरुवात केली. नागरिकांना पावसातच थांबावं लागेल म्हणून राज ठाकरे यांनी मुलाखत देण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांनी सरकार आणि पाऊस कधी कोसळेल हे सांगता येत नाही, असा चिमटा काढला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.
राज ठाकरे म्हणाले, ”अचानक पावसाचं काय सुरू झालं, कोणालाच काही कळत नाही. सध्या सरकार आणि पाऊस हे कधी येतील आणि कधी कोसळतील काही कळत नाही. पण आजचा हा मुलाखतीचा कार्यक्रम, मुलाखत सुरू असताना एकतर आमच्या डोक्यावर छप्पर, तुमच्या डोक्यावर नाही. त्यातमध्ये पाऊस आणि अशा परिस्थितीत मी काही मुलाखत देऊ इच्छित नाही.”
याशिवाय, ”याचं महिन्याची एक तारीख निवडून मी याच ठिकाणी मुलाखत देईन हा शब्द देतो.” असं म्हणत राज ठाकरेंनी उपस्थितांना आश्वासनही दिलं.