बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणेंनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा पराभव केला. त्यामुळे, येथील मतदारसंघात शरद पवारांनी लावलेलं उमेदवाराचं गणित चांगलंच जुळलं. आता, विधानसभेलाही शरद पवारांनी परळी मतदारसंघ मनावर घेतला आहे. विधानसभेला आपण परळीत मोठी सभा घेणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. त्यामुळे, परळीचे आमदार धनंजय मुंडेंविरुद्ध आता शरद पवारच मैदानात उतरणार असल्याचे दिसून येते.
गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती तुतारी घेतली. फड यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. जर त्यांना उमेदवारी दिली तर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर राजाभाऊ फड यांचे आव्हान राहू शकते. त्यातच, शरद पवारांनी या पक्षप्रवेशावेळी तसे संकेतही दिले आहेत.