राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकहाती ११० हून जागा मिळवत काँग्रेसला पराभवाची धूळ चारली आहे.
राजस्थानचं मुख्यमंत्री पद ज्यांच्याकडे जाऊ शकतं अशा नावांपैकी दोन प्रमुख नावं आहे ती म्हणजे जयपूरच्या राजघराण्याच्या दीया कुमारी आणि योगी बालकनाथ. विद्यमान स्थितीत दोघंही खासदार होते. मात्र या दोघांनाही भाजपाने तिकिट दिलं आणि विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगितली. दोघंही निवडून आले आहेत. राजस्थानात मुख्यमंत्रीपदाचे हे दोघेही प्रमुख दावेदार मानले जात आहेत. आता मुख्यमंत्री म्हणून भाजपा कुणाच्या गळ्यात माळ घालणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
योगी बालकनाथ यादव जातीचे आहेत. ओबीसी असल्याने त्यांना जर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली तर भाजपा इथे ओबीसी कार्ड खेळू शकते. बालकनाथ यांचं यादव असणं उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाला फायदेशीर ठरु शकत. उत्तर प्रदेश आणि बिहार या ठिकाणी यादव वर्गाची मतं मोठ्या प्रमाणावर आहेत.
जयपूरच्या राजघराण्याच्या महाराणी दीया कुमारी यांनी अनेकदा दावा केला आहे की त्या श्रीरामाचे पुत्र कुश यांची ३९९ वी पिढीतल्या आहेत. त्यांचे वडील भवानी सिंह १९७१ भारत-पाक युद्धात पराक्रम गाजवला होता. दीया कुमारी या हिंदुत्व आणि राष्ट्रवाद यावर आपले विचार मांडत असतात. एकदा त्यांनी ताजमहाल हा आमच्या घराण्याच्या मालकीचा आहे असंही म्हटलं होतं. तसंच आमच्याकडे तसे दस्तावेज आहेत असाही दावा केला होता. आज तकने हे वृत्त दिलं आहे.