अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. VVIP लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या सोहळ्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आले नाही. राज ठाकरे यांना मात्र निमंत्रण मिळाले आहे. त्यावरुन खासदार संजय राऊत सातत्याने टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे हे साधे आमदार आहेत. केंद्राच्या व्हीव्हीआयपीच्या यादीत उद्धव ठाकरे नसतील. राज ठाकरे असतील. यामुळे राज ठाकरे यांना बोलावले असेल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.
अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय आहे. घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. आम्ही वीस, वीस दिवस कारागृहामध्ये होतो. तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते? बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी कारसेवा केल्याचा एखादा फोटो दाखवावा, असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले.