पहिल्याच पावसात राम मंदिराच्या गाभाऱ्याला गळती लागल्याचा दावा मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास महाराज यांनी केला आहे. पहिल्या पावसानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचल्याचे ते म्हणाले. याशिवाय त्यांनी मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याच्या कालावधीबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.
सत्येंद्र दास महाराज यांनी नुकताच एएनआय वृत्तसंस्थेला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी राम मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचत असल्याचे सांगितले. जिथे प्रभू श्रीमाराची मूर्ती विराजमान आहे, तिथे पहिल्याच पावसात गळती सुरु झाली आहे. पहिल्या पावसामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचले होते. त्यामुळे बांधकामावेळी नेमकी काय चूक झाली. याची माहिती घेणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. तसेच यावर उपाययोजना न केल्यास मंदिरात पुजा करणे कठीण होईल, असेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याच्या कालावधीबाबतही प्रतिक्रिया दिली. मंदिराचं बांधकाम अद्याप सुरू आहे. या मंदिरात आणखी काही मुर्ती स्थापन करण्यात येणार आहे. २०२५ पर्यंत हे बांधकाम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, आता २०२४ सुरू आहे. २०२५ ला केवळ एक वर्ष बाकी आहे. त्यामुळे एका वर्षात हे बांधकाम पूर्ण होणं अशक्य आहे, असे ते म्हणाले.