आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठ्या प्रमाणात नेत्यांची इनकमिंग सुरू आहे. यातच शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा एक मोठा धक्का दिला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि त्यांचे सुपुत्र अनिकेत निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थित त्यांनी हा पक्षप्रवेश केला आहे.
यावेळी फलटणचे विद्यमान आमदार दिपक चव्हाण यांच्यासह संपूर्ण राजे गट उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादी सामील झाला आहे.
यावेळी बोलताना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत की, तुम्ही स्वगृही येत आहात तुमचं स्वागत. मला माहित होतं तुम्हा तिकडे करमणार नाही. आता योग्य ठिकाणी आपला राम जायला लागला आहे. राम कधी दिसत नाही, तसा राम आज आपल्याला मंचावर दिसत नाही, पण तो आहे, असं नाव न घेता रामराजे नाईक निंबाळकर हे देखील शरद पवार गटासोबत असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ”रामराजे यांच्याशिवाय आम्हाला करमत नव्हतं. तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो, आपल्या आशीर्वादाने या मतदारसंघात तुतारी वाजण्याची तुमच्यावर जबाबदारी आहे. संजीव राजे आणि दिपक चव्हाण यांच्या हातात तुतारी देतोय. मला माहिती आहे की, इथे काय अन्याय झाला आहे. पोलीस ठाण्याचा वापर किती टोकाचा झाला आहे.”