महायुतीचे रामटेकमधून राजू पारवे उमेदवार आहेत. असे असतानाही प्रचारासाठी तसेच सभा, बैठकांसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने असंतोष निर्माण झालेला आहे. या असंतोषात मोदी यांच्या सभेनंतर भरच पडली आहे. मोदी यांच्या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नसल्याने सभा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी पक्ष कार्यालयात बसून होते. तसेच एकाही पदाधिकाऱ्याला व्यासपीठावर प्रवेश दिला नाही.
सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नेत्या ॲड. सुलेखा कुंभारे या मित्रपक्षांच्या नेत्यांची भाषणे झाली. मात्र, खासदार प्रफुल पटेल व्यासपीठावर उपस्थित असतानाही त्यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही. महायुतीची सभा असल्याने भाजप आणि शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर आणि शहराध्यक्ष प्रशांत पवार यांना सभेचे निमंत्रण नव्हते.