रामटेक: माझ्या नादाला लागू नका, मला आडवे आलात तर मी कोणालाही सोडत नाही, असा जाहीर इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला आहे. नागपूरच्या रामटेक येथे शिवसंकल्प अभियानांतर्गत आयोजित सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. शिवसेनेच्या शिंदे गटाने आयोजित केलेल्या शिवसंकल्प अभियानाचा पुढचा टप्पा नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात पार पडला.
रामटेकच्या सभेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार कृपाल तुमाने, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार आशिष जयस्वाल, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रामटेक परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही रामचरण स्पर्शाने पावन झालेल्या रामटेकमधील रामाचे दर्शन आधी घेणार आणि त्यानंतरच सगळे अयोध्येला जाणार. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे जात राहू.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून केलेल्या टीकेलाही शिंदे यांनी यावेळी उत्तर दिलं. शिंदे म्हणाले, दाढी खेचून आणली असती… ही दाढी इतकी हलकी आहे का? या दाढीने जर काही काडी फिरवली तर तुमची उरली-सुरली लंकासुद्धा जळून खाक होईल. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका. मी कोणाला आडवा जात नाही. परंतु, मला कोणी आडवा आला तर मी त्याला सोडतही नाही. कारण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची मला शिकवण मिळाली आहे.