भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. आम्ही मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायला तयार आहोत, पण आधी विरोधकांनी त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ही बाब मान्य असल्याचे वचन द्यावे, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले. ते मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला जितके आरक्षण देणे शक्य आहे,तितके आरक्षण आम्ही दिले आहे. परंतु, तेवढ्याने मनोज जरांगे पाटील यांचे समाधान झालेले नाही. त्यापेक्षा जास्त आरक्षण हवे असेल तर तो मागण्याचा अधिकार मनोज जरांगे यांना आहे. पण आता (लोकसभा निवडणूक) ज्यांना कोणाला जास्त मतं पडली आणि जे निवडून आले त्यांनी म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने फक्त एकच मागणी करावी की, जरांगे पाटील ज्याप्रमाणे म्हणतात ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्या, ते आरक्षण द्यायला आम्ही तयार आहोत. तसं वचन विरोधकांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात द्यावे, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.