राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हाच्या वादाच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा दिलासा दिला आहे. शरद पवार गटाला तुतारी चिन्ह लोकसभा निवडणुकीपर्यंत वापरता येणार आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नावही वापरण्याची मुभा दिली आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटाला तुतारी चिन्ह आता राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीतही वापरता येणार आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह राखीव ठेवावे आणि इतर कोणत्याही पक्षाला , उमेदवाराला देऊ नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
तसंच, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांच्या संदर्भात ते पोस्टरमध्ये शरद पवारांचे नाव वापरणार नाहीत, असे हमीपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत. तर, अजित पवार गटाने मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये नोटीस जारी करून त्यामध्ये सर्व प्रचारांच्या जाहीरातींमध्ये पक्षनाव आणि पक्षचिन्हाबाबतचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं नमूद करावं, असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत.