अहमदनगर-धार्मिक भावना दुखावल्याच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी दिलीप भळगट याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात गुलामअली रहेमान शेख (रा. गाझीनगर, काटवन खंडोबा रस्ता, नगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
भळगट याने एका व्हॉटसअॅप ग्रुपवर अजमेर येथील दर्ग्या बाबत चुकीचे व अवमानजनक शब्द टाकल्याने धार्मिक भावना दुखावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निरनिराळ्या धर्मात व गटात शत्रूत्वाची भावना वाढेल किंवा एकोपा टिकण्यास बाधक होईल, असे कृत्य करून धार्मिक श्रध्देचा बुध्दीपरस्पर व द़ृष्ट हेतूने अपमान करून धार्मिक भावना दुखावून दोन समाजामध्ये शत्रूत्व, द्वेषभाव किंवा वितुष्ट निर्माण होईल, असा व्हीडीओ प्रसारित केल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत स्पष्ट केले गेले आहे.
20 सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व कोतवाली पोलिसांनी भळगट याला ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भान्सी अधिक तपास करीत आहेत.