Saturday, October 12, 2024

जिल्हा बँकेच्या नोकरभरतीला स्थगिती द्या ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

नगर :नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये करण्यात येणाऱ्या नोकरभरतीच्या प्रक्रियेस स्थगिती देण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ही भरती प्रक्रिया राबविणाऱ्या वर्क वेल या कंपनीवर खा. लंके यांनी आक्षेप घेतला असून बेकायदेशीरपणे पॅनलवर नेमलेल्या या कंपनीस पॅनलवरून दुर करण्याची मागणीही खा. लंके यांनी केली आहे.
यासंदर्भातील पत्रात खा. लंके यांनी नमुद केले आहे की, वर्क वेल कंपनीचा सहकार आयुक्तालयाने बेकायदेशीरपणे तालिकेत समावेश केला असून राज्यातील अनेक विभागांच्या भरती प्रक्रीयेसाठी या कंपनीची निवड करण्यात आली आहे. वर्क वेल कंपनीचा अनुभव पाहता शासनाच्या आदेशात नमुद केल्याप्रमाणे राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका तसेच शासनातील विविध विभागांसाठी किमान तीन वेळा ऑनलाईन नोकर भरती प्रक्रीया राबविल्याचा अनुभव असला पाहिजे ही अटच कंपनी पात्र करीत नसल्याकडे खा. लंके यांनी लक्ष वेधले आहे.

किरकोळ स्वरूपाच्या भरतीचा अनुभव

वर्क वेल कंपनीने यापूर्वी राज्यातील काही बँका, पतसंस्था, रेल्वे नगरपरीषद आदींच्या किरकोळ जागा भरतीची प्रक्रीया राबविली आहे. शिवाय त्यातील बहुतांशी पदे कंत्राटी स्वरूपाची आहेत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लिपिक व शिपाई या भरतीची प्रक्रिया या कंपनीने राबविली असून शासनाच्या निकषानुसार केवळ ठाणे जिल्हा बँकेच्या नोकरभरतीचा एकच अनुभव या कंपनीकडे आहे. शासनाच्या आदेशात नमुद केल्याप्रमाणे या कंपनीकडे अनुभव नाही.

बेकायदेशीर कर्ज, साठीचे एम.डी !

जिल्हा सहकारी बँकेने सहकारी साखर कारखान्यांना बेकायदेशीर कर्ज वितरण केले आहे. बँकेचा सीडी रेशो घसरला आहे. त्याबाबत विभागीय सह निबंधक, नाशिक यांनी चौकशी सुरू केली आहे. बँक सक्षम मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा शोध न घेता रावसाहेब वर्पे यांना वयाच्या साठीनंतरही बेकायदेशीरपणे वारंवार मुदतवाढ देत आहे. संचालक सीताराम गायकर हे निवडणूक लढविण्यास पात्र नसताना त्यांना बँकेने व उपनिबंधक कार्यालयाने निवडणूक लढवू दिली. बँकेचे अनेक संचालक बैठकांनाच उपस्थित नसतात. त्यामुळे अशा परिस्थितीत या बँकेत भरतीबाबत घेतले जाणारे निर्णय कायदेशिर आहेत का ? हा प्रश्‍न असल्याचे लंके यांनी म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles