कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे.या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर आज, मंगळवारपासून कोणतेही नियमित काम करणार नसल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) संघटनेने निवेदनाद्वारे कळविले आहे.
या काळात ‘अत्यावश्यक सेवा’ मात्र सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे रुग्णालयाच्या दैनंदिन कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया (फोरडा) या राष्ट्रीय पातळीवरील निवासी डॉक्टरांच्या संघटनेनेसुद्धा सर्व निवासी डॉक्टरांना निवडक सेवा बंद करण्याचे आवाहन केले होते.
त्यानंतर मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील निवासी डॉक्टर संघटनेने आणि राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांनी त्यांचा निर्णय जाहीर केला.
हे ‘काम बंद आंदोलन’ मागण्या पूर्ण होईपर्यंत असून अनिश्चित कालावधीसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय वर्तुळात कोलकाता येथील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे.कोलकात्यामधील आर जी कर वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील पदव्युत्तर विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्यामुळे राज्यात संतापाचे वातावरण आहे. रुग्णालयाच्या परिसंवाद सभागृहामध्ये डॉक्टर तरुणीचा मृतदेह शुक्रवारी आढळला.
तेव्हापासून राज्यात जनक्षोभ उसळला असून विविध सरकारी रुग्णालयांमधील शिकाऊ डॉक्टर, अंतर्वासित डॉक्टर आणि पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर निदर्शने करत आहेत. दोषींना शिक्षा होईपर्यंत निदर्शने सुरूच ठेवणार असल्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे. शिवाय दिल्ली, बंगळूरु येथेही निदर्शने सुरू आहेत. दिल्लीतील सरकारी रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरांनी बेमुदत संपाचे आवाहन केले आहे.