ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अत्यंत कमी कालावधीत रोहिणी खडसे यांनी जळगावच्या राजकारणात आपली ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रवादीच्या आक्रमक नेत्या म्हणून त्यांना ओळखलं जातं. राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमाला त्या आवर्जून हजेरी लावतात. हातात माइक घेऊन रोहिणी खडसे नेहमी आपल्या पक्षाची भूमिका मांडत विरोधकांवर टीकेचा भडिमार करतात.
अशातच रोहिणी खडसे यांनी रविवारी (ता २९) जळगाव येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात रोहिणी यांच्या हातात माइक ऐवजी चक्क साप असल्याचं दिसून आलं आहे. त्यांचा हा नवा अवतार चर्चेचा विषय ठरला असून हातात साप पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकजण रोहिणी यांच्या धाडसाचं कौतुक करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवचरण उज्जेंकर फाऊंडेशनकडून मुक्ताईनगर येथे रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजिन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यासोबतच सर्वसामान्य जनतेला सापांची ओळख व्हावी तसेच विषारी, बिन विषारी साप कसे ओळखावे, याबाबत जनजागृती करण्यात आली.