ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन पुकारले आहे. त्यांनी लोकशाहीचं वस्त्रहरण सुरू झाल्याचं म्हटलं आहे. तसंच ईव्हीएमवरही संशय घेतला आहे. दरम्यान, बाबा आढावांच्या या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यावर टीका केली.रोहित पवार म्हणाले, “भाजपाची सत्ता आली आहे, त्यामुळे अण्णा हजारे आता आंदोलन करणार नाहीत. भाजपाची सत्ता नसते तेव्हा ते आंदोलन करत असतात. पण आता सत्ता भाजपाची आलीय, तसंच ते आजारीही असतील. सत्ता भाजपाची असेल त्यामुळे त्यांना काही कष्ट करावे लागणार नाहीत.”
“या वयात खूप परिश्रम करणं योग्य नाही. बाबा आढावसारखे सामाजिक कार्यकर्ते परिश्रम करतात. त्यांनी माघार घ्यावी. पण ते ऐकायच्या मनस्थितीत नाहीत. असे हाडाचे कार्यकर्ते समाज परिवर्तनासाठी कार्य करत आहेत. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढाकार घ्यावा कारण लोकशाही धोक्यात आल्यासारखी वाटतेय”, असंही रोहित पवार म्हणाले.
महात्मा फुले वाडा येथे डॉ. आढाव यांनी गुरुवारपासून आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे. रिक्षा पंचायतीचे नितीन पवार, संदेश भंडारे या वेळी उपस्थित होते. हे उपोषण ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. डॉ. आढाव म्हणाले, की अदानींचे प्रकरण घडत असताना पंतप्रधानांनी परदेशातून त्यांना पाठिंबा दिला. या प्रकरणाची संसदेत वाच्यताही होऊ नये म्हणून जे चालले आहे ते लांछनास्पद आहे. विधानसभा निवडणुकीत सरकारी पैशाचा खुळखुळा वाजला. जनतेने या पैशाला भुलू नये. मतदानानंतर मतदानाच्या आकडेवारीमध्ये सतत बदल होतात. त्यामुळे ईव्हीएमबाबत शंका घेण्यास जागा आहे आणि ती रास्त आहे. हिंदू-मुस्लिम वाद निर्माण केले जात आहेत. मुस्कटदाबीच्या विरोधात समाजातील जागरूक वर्गाने बोलले पाहिजे. एकटा माणूसही बोलू शकतो ही लोकशाहीची शक्ती आहे.