महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्वात महत्वाचे विधान केले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी (ता. २९ सप्टेंबर) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदार संघात खर्डा येथील शिवपट्टण किल्ला जतन व संवर्धन, वखार महामंडळ गोदाम बांधकाम,खर्डा जामखेड रस्ते कामाचे उद्घाटन शरद पवार तसेच खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा किस्सा सांगताना रोहित पवारांबाबत एक महत्वाचे विधान केले.
“मी कधी मंत्री झालो नाही, पदाची अपेक्षा केली नाही. रोहितनेही कधी पक्षाकडे पदाची अपेक्षा केली नाही. मी सुद्धा पाच वर्ष मंत्री नव्हतो, पण आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर मी सत्तेचे एक नाही तर दुसरे ठिकाण मिळत गेले. मी गृह खात्याचा राज्यमंत्री झालो, कृषी खात्याचा, आणि नंतर वसंतदादांचे सरकार गेल्यानंतर मी स्वतःच मुख्यमंत्री झालो, एकदा नाही चार वेळा मुख्यमंत्री झालो, असं शरद पवार म्हणाले.
रोहितचीही पहिली पाच वर्ष तुमची सेवा करण्यासाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी. आणि ही महाराष्ट्राची सेवा महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल, अशा प्रकारची असेल. असे सर्वात महत्वाचे विधान शरद पवार यांनी केले. दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात उलट- सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. शरद पवार यांचे हे विधान म्हणजे रोहित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची तयारी तर नाही ना? असा सवाल आता उपस्थित होत आहे.