शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी २०१४ नंतर, अर्थात नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या टर्मपासून गोष्टी बदलल्या असल्याचं म्हटलं आहे. “भाजपा हळूहळू शिवसेनेची ताकद कमी करत गेलं. मुंबई महानगर पालिकेतही तेच झालं. आमदारांची संख्याही उलट झाली. म्हणजे शिवसेना कमी झाली आणि भाजपा वाढली. हळूहळू अपक्ष उमेदवार उभे करणं किंवा शिवसेनेचे उमेदवार पाडणं, अशा खेळी भाजपाने केल्या”, असं रोहित पवार म्हणाले.
“भाजपाच्या या धोरणानंतर शिवसेना शहाणी झाली आणि त्यांनी महाविकास आघाडीत येऊन एक वेगळं समीकरण सगळ्यांना दाखवलं”, असंही रोहित पवार यांनी नमूद केलं.
यावेळी बोलताना रोहित पवारांनी भाजपाच्या धोरणावर भाष्य केलं. “भाजपाकडून जी परिस्थिती शिवसेनेची करण्याचा प्रयत्न झाला, तशीच स्थिती अजित पवार मित्रमंडळ व एकनाथ शिंदे गटाची होईल, अशी चर्चा लोकांमध्ये चालू आहे. सगळ्यांनीच याची दक्षता घेतली पाहिजे. भाजपाला लोकनेते चालत नाहीत. लोकांमधले पक्ष चालत नाहीत. भाजपाबरोबर जाणारे पक्ष किंवा नेत्यांना हळूहळू राजकीय जीवनातून संपवलं जातं”, असा गंभीर दावा रोहित पवार यांनी केला आहे.