कर्जत-जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांना सीआरपीएफ केंद्रावर पोलिसांनी अडवलं आहे. रोहित पवार सीआरपीएफ केंद्रावर पोहोचले तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. जामखेड तालुक्यात सीआरपीएफ केंद्राचं लोकार्पण वादात सापडलं आहे. केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी आमदार राम शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जामखेडमधील कुसडगावामध्ये एसआरपीएफ केंद्राच्या लोकार्पणावरुन वाद निर्माण झाला. लोकार्पणाला प्रशासनाचा विरोध आहे. यावेळी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार होतं. आमदार रोहित पवार यांनी या लोकार्पणाचं आयोजन केलं होतं. पण पोलिसांकडून रोहित पवारांना कार्यक्रमस्थळी आत जाण्यास मज्जाव करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांकडून देवेंद्र फडणवीस आणि राम शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.