कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील राशीन येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा असल्याने तरुणांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमात रोहित पवारांनी रोहित शर्माला पाच प्रश्न विचारली. रोहित शर्माने या प्रश्नांची धडाकेबाज उत्तरे दिली आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोहित पवार म्हणाले की, कसे आहात कर्जत जामखेडकर. आपल्या सर्वांचे लाडके हिटमॅन इथे आलेले आहेत. आपल्या सर्वांसाठी त्यांनी आणि आपल्या टीमने वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. त्यामुळे रोहित शर्मा यांच्या आवाजाचा जयघोष मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. असे म्हणताच उपस्थित तरुणांनी रोहित…रोहित…रोहित….रोहित… असा एकच जल्लोष केला. यानंतर रोहित पवार यांनी रोहित शर्माला पाच प्रश्न विचारले.
यावेळी रोहित शर्मा म्हणाला की, “अलीकडेच आम्ही आमचे मोठे लक्ष्य गाठत भारतासाठी ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला. विश्वचषक जिंकल्यावर माझ्या जीवात जीव आला. पण, मी आज इथे कशासाठी आलोय हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. क्रिकेट हा खेळ सर्वांनाच आवडतो. इथे आम्ही क्रिकेट अकादमी सुरू करतो आहोत. मला खात्री आहे की, पुढचा यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, जसप्रीत बुमराह सगळे इथूनच येतील. माझे मराठी एवढेच होते. तुम्ही सर्वांनी भरपूर प्रेम दिल्याबद्दल आभार. इथे पुन्हा येण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन”, असे त्याने म्हटले.