राष्ट्रवादीत झालेली ही बंडखोरी म्हणजे ऑपरेशन लोटसचा भाग असल्याची टीका महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये आर.आर.आबा यांचं भाषण असून दहा वर्षांपूर्वी भाजपाला आर.आर.आबांनी काही प्रश्न विचारले होते, त्याची उत्तरे अद्यापही मिळाले नसल्याचे रोहित पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
रोहित पवारांनी शेअर केलेला व्हिडीओ हा दहा वर्षांपूर्वीचा असल्याचं म्हटलं आहे. त्यात आर.आर. पाटील भाजपावर टीकास्त्र डागत आहेत. “ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते, आज त्यांना सन्मानाने भाजपामध्ये घेतलं जातंय. भाजपाला मी विचारू इच्छितो की तुम्ही आजपर्यंत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, असं कोणतं तीर्थ यांच्यावर शिंपडलं अन् हे पवित्र झाले? राज्यामध्ये आयाराम गयाराम संस्कृतीला खत घालण्याचं काम भाजपाने केलं आहे. हा आजपर्यंत म्हणजे साधुसंतांचा पक्ष असा दावा भाजपाचे लोक करत होते. अलिकडच्या काळात भाजपा पक्ष साधुसंतांचा पक्ष नाही, संधीसांधूंचा पक्ष आहे. आज एवढ्या लोकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. दाल मे काला असं म्हटलं जातं, पण आता काले मे दाल अशी भाजपाची अवस्था झाली आहे.”
स्व. आर. आर. पाटील (आबा) यांनी दहा वर्षांपूर्वी भाजपला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अद्यापही बाकी आहे… pic.twitter.com/7SZoAaZqjC
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 5, 2023






