मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यामुळे भुजबळ समर्थकांनी राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. काही कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी कार्यकर्त्यांचे कान उपटले आहेत.
“छगन भुजबळ साहेब, आपल्या आंदोलकांना तंबी द्या, अजित दादांच्या प्रतिमेला जोडे मारणं अत्यंत चुकीचं आहे.” अशा शब्दात रुपाली ठोंबरे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.
छगन भुजबळ आपल्या ओबीसी समाजाचे अभ्यासू, आक्रमक आणि ज्येष्ठ नेते आहात. मंत्रिपद नाही मिळाले म्हणून नाराज होणे स्वाभाविक आहे, पण आपण अजित दादांशी थेट बोलू शकता, असं रुपाली पाटील म्हणाल्या.
आपल्या ओबीसी बांधवांनी थेट अजित दादांच्या प्रतिमेला जोडे मारणे अत्यंत चुकीचे आहे. उलट आपण त्या आंदोलकांना तंबी दिली पाहिजे. अजित दादा सर्व धर्माला, जातीला एकत्र घेऊन जाणारे खमके नेतृत्व आहे. आपल्याला ते ज्ञात आहेच मधल्या काळात आपल्या मुलाला विधान परिषद दिली, पुतणे समीर भाऊ यांच्यावर पक्षाची महत्त्वाची जबाबदारी होती, याची आठवण रुपाली पाटलांनी करुन दिली.