आशियाई क्रीडा स्पर्धेत रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिसमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले. टेनिसमध्ये भारताला मिळालेलं हे पहिले सुवर्णपदक असून भारताचे हे एकूण नववे सुवर्णपदक आहे. ऋतुजा अहमदनगर ग्रामीणचे डिवायएसपी संपतराव भोसले यांची कन्या आहे. श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे जन्मलेल्या ऋतुजा भोसले यांच्यावर या कामगिरीमुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भोसले कुटुंब मूळ सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे. संपतराव भोसले यांची श्रीरामपूर तालुक्यातील सासूरवाडी कारेगावची. संपतराव भोसले हे सध्या नगर येथे ग्रामीण डीवायएसपी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी शिर्डी आणि शेवगावातही पोलिस निरीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. ऋतुजाचा जन्म श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे झालेला आहे. तिने वयाच्या नवव्या वर्षीच टेनिस खेळण्यास सुरूवात केली. तिचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले आहे. त्यानंतर उच्च शिक्षण अमेरिकेत झालेले आहे. हे शिक्षण घेतल्यानंतर ती 2017 साली पुन्हा भारतात आली. तिला प्रशिक्षक केदार शाह यांचे मार्गदर्शन लाभले.