सलमान खान, कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित ‘टायगर ३’ चित्रपट १२ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर जगभरात प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने पहिल्या पाच दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर तब्बल २०० कोटींचा गल्ला जमावला आहे, तर जगभरात भाईजानच्या चित्रपटाचं एकूण कलेक्शन ३०० कोटींच्या घरात पोहोचलं आहे. चित्रपटाने केलेल्या या दमदार कामगिरीबद्दल ‘टायगर ३’ च्या टीमने सक्सेस पार्टीचं आयोजन केलं होतं.
‘टायगर ३’च्या सक्सेस पार्टीला सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी या चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी सलमानने निळ्या रंगाचा डेनिम टी-शर्ट आणि त्यावर ‘टायगर ३’ मधील आयकॉनिक स्कार्फ परिधान केला होता. तसेच अभिनेत्री कतरिना कैफने पिवळ्या रंगाचा सुंदर असा वन पीस घातला होता. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
‘टायगर ३’च्या टीमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सलमान-कतरिनाने ‘लेके प्रभु का नाम’ या गाण्यावर डान्स केला. यावेळी भाईजानने कतरिनाला त्याचा स्कार्फ गिफ्ट म्हणून दिला. या काळ्या रंगाच्या स्कार्फवर ‘टायगर ३’ असं लिहिलेलं आहे. सलमानने स्वत:च्या हाताने अभिनेत्रीच्या गळ्यात स्कार्फ घातला आणि तो म्हणाला, “आता याचा चुकीचा अर्थ काढू नका.” अभिनेत्याची ती कृती पाहून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सगळ्याच लोकांनी भाईजानचं कौतुक केलं.