संभाजी ब्रिगेडचे 22 ऑगस्टला वाशी येथे राज्यस्तरीय अधिवेशन
अधिवेशनाच्या तयारीसाठी नगरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक
जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे -प्रदेश संघटक प्रदीप कणसे
अहमदनगर (प्रतिनिधी)- संभाजी ब्रिगेडचे वाशी (नवीन मुंबई) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे नियोजन बैठक पार पडली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रदीप कणसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा आढावा घेऊन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना या अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रदेश संघटक प्रदीप कणसे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांपुढे संभाजी ब्रिगेडच्या स्थापने पासूनचा आढावा घेतला. भविष्यातील असलेली वाटचाल या अधिवेशनातून ठरणार असून, सर्व कार्यकर्त्यांनी या अधिवेशनात सहभागी होण्याचे त्यांनी म्हंटले आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून सोडविण्यात आलेल्या प्रश्नांचा लेखाजोखा संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी मांडला.
जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी संभाजी ब्रिगेड युवकांना दिशा देण्याचे काम करत आला आहे. समाजात असलेली बेरोजगारी व वाढत चाललेले धार्मिक ध्रुवीकरण थांबविण्यासाठी संभाजी ब्रिगेड कार्य करत असल्याचे सांगून त्यांनी संभाजी ब्रिगेडचे ध्येय धोरणे स्पष्ट करुन राज्यस्तरीय अधिवेशनात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सांगितले.
22 ऑगस्ट रोजी वाशी नवी मुंबई येथे संपन्न होणाऱ्या एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी आमदार रोहित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे, निखील चव्हाण, गौरव मोरे उपस्थित राहणार आहे. पहिल्या सत्रात उद्योजक प्रफुल्ल वानखेडे व पत्रकार अभिजीत करंडे मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात पत्रकार श्रीराम पवार, निरंजन टकले, लेखक चंद्रकांत झटाले यांचे महाराष्ट्र धर्म कार्य शिकवतो? व गांधीजींच्या स्वप्नातील भारत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. चौथ्या सत्रात ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या विचारधारेची लोकशाही यावर व्याख्यान देणार आहे. संध्याकाळी अधिवेशनाचा समारोप सोहळा खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या बैठकीत प्रदेश संघटक कणसे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा, शहर, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आले.
या बैठकीसाठी जिल्हा उपाध्यक्ष नानाजी शिंदे, जिल्हा संघटक कृष्णदीप (भैय्या) चिकणे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव जाधव, महानगराध्यक्ष संदीप यादव, महानगर उपाध्यक्ष संकेत मोरे, शहर संघटक अविनाश सायंबर, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष प्रसाद काटे, राशीन शहराध्यक्ष इरफान (मुन्ना) मुंडे, राशीन शहर उपाध्यक्ष मयुर धनवडे, मिरजगाव शहराध्यक्ष क्रीश शिंदे आदी उपस्थित होते. संग्राम देशमुख यांनी प्रास्ताविक केले. महादेव जाधव यांनी आभार मानले.
संभाजी ब्रिगेडचे 22 ऑगस्टला राज्यस्तरीय अधिवेशन, नगरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक
- Advertisement -