23 ऑगस्ट रोजी पुणे येथे संभाजी ब्रिगेडचा लोकशाही जागर मेळावा…
नगर मधून जाणार ५०० कार्यकर्ते…
संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे वर्धापन दिनानिमित्त लोकशाही जागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 23 ऑगस्ट शुक्रवार रोजी 11 वाजता हा मेळावा पुणे येथे बालगंधर्व रंग मंदिरात पार पडणार असून यानिमित्ताने अहमदनगर जिल्हा संभाजी ब्रिगेडची महत्वपूर्ण बैठक नगर येथे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
देशातील व राज्यातील राजकीय परिस्थिती , सामाजिक ध्रुवीकरण, जातीय व धार्मिक दंगली आणि राजकारण या विषयावर वैचारीक प्रबोधन होणार आहे. संभाजी ब्रिगेड व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची युती असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेत येण्यासाठी एक जीवाने प्रयत्न करण्याच्या दृष्टीने संभाजी ब्रिगेड पक्ष प्रमुख अँड मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर, प्रवक्ते गंगाधर बनबरे, डॉ. शिवानंद भानुसे, डॉ. संदीप कडलग, प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार आदी मान्यवर मार्गदर्शन करणारं आहेत. बेरोजगारी , महागाई , शेतकरी आत्महत्या हे निवडणुकीचे मुद्दे असताना सत्ताधारी जातीय व धार्मीक दंगली घडवून सामाजिक अशांतता निर्माण करत आहे. सुशिक्षित तरूण पुणे – मुंबई या ठिकाणी जाऊन MPSC , UPSC परीक्षेची तयारी करत आहेत मात्र केंद्रातील मोदी सरकार लेट्रल एंट्री नावाखाली IAS होऊन नियुक्ती होण्या ऐवजी सरळ नियुक्ती देऊन लोकशाही , संविधान , आरक्षण संपवण्याची तयारी करत आहे. शेतकरी शेतमालाला हमी भाव मिळण्यासाठी आंदोलनं करत असून सरकार मात्र डोळेझाक करत आहे. देशातील व राज्यातील सरकारे लोकशाहीचा गळा अवळत आहेत. या पार्श्वभुमीवर संभाजी ब्रिगेडचा लोकशाही जागर मेळावा दिशादर्शक ठरणार आहे.
या मेळाव्यासाठी नगर जिल्ह्यातून पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहण्याचे दृष्टीने या बैठकीत चर्चा करून पाचशे कार्यकर्ते या मेळाव्यासाठी जाण्याचे नियोजन करण्यात आले, यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता भोसले, शरद जोशी, राहुल भिंगरदिवे, जिल्हा सचिव निलेश बोरुडे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन काकडे, अंकुश जगताप, अवि मेढे, अँड सावंत, अचुत गाडे, तालुकाध्यक्ष इंजी शाम जरे श्रीगोंदा, सुदाम कोरडे पारनेर, लक्ष्मण गायके शेवगाव, डॉ. राहुल देशमुख पाथर्डी, राजेंद्र काटकर जामखेड, गणेश बोरुडे नगर, आदी उपस्थित असल्याचे जिल्हा अध्यक्ष राजेश परकाळे यांनी सांगताना अहमदनगर मधून पाचशे कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.