विशाळगडावरील अतिक्रमण मुक्त मोहिमेनंतर संभाजी राजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या अधिकृत पेजवरील पोस्टने राज्यात चर्चांना उधान आलं आहे. हिंदूपदपातशहा असा संभाजी राजेंचा उल्लेख असलेली पोस्ट स्वराज्य संघटनेच्या अधिकृत पेजवर व्हायरल झालील आहे. हिंदू पदपातशहा म्हणजेच हिंदूंचा सर्वोच्च राजा असा अर्थ होतो, त्यामुळे यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हिंदूपदपातशहा छत्रपती संभाजी राजे यांनी विशाळगड अतिक्रमणमुक्तीची मोहीम फते केल्याबद्दल सर्व शिवभक्तांच्या वतीने अभिनंदन! विशाळगडावरील ७० पेक्षा अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त, अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे, असं स्वराज्य संघटनेच्या अधिकृत पेजवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सध्या कोल्हापूरमधील विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. संभाजी राजेंनी याअतिक्रमणाविरोधात विशाळगडावर आंदोलन केलं होतं. यावेळी तोडफोड झाली होती. त्यानंतर अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र स्वराज्य संघटनेच्या आजच्या पोस्टमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांन उधान आलं आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी दोन दिवसांपूर्वी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती आक्रमक झाले होते. त्यांनी ‘चलो विशाळगडचा नारा’ दिला होता. त्यानुसार ते शेकडो कार्यकर्त्यांसह विशाळगडावर पोहचले होते. ‘जोपर्यंत राज्य शासन या अतिक्रमणासंदर्भात ठोस निर्णय घेत नाही. तोपर्यंत आपण या ठिकाणाहून हलणार नाही.’ असा आक्रमक पवित्रा संभाजी राजे यांनी घेतला होता. त्यानंतर प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर आज स्वराज्य संघटनेच्या अधिकृत पेजवर हिंदूपदपातशहा असा संभाजी राजेंचा उल्लेख असलेली पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे.