लायकी नसताना आम्हाला तुमच्या हाताखाली काम करावं लागलं, असं विधान मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. या विधानाचे ओबीसी समाजातून तीव्र पडसाद उमटले. जरांगे पाटील हे मग्रुरीची भाषा करत असल्याची त्यांच्यावर टीका होऊ लागली. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी तर बहुजन आणि मुस्लिम समाजातील महापुरुषांची नावे आणि त्यांचं कर्तृत्व वाचून दाखवत यांची लायकी नव्हती काय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांना करत जरांगे यांची कोंडी केली आहे. भुजबळ यांच्या या घणाघाती हल्ल्यानंतर जरांगे पाटील बॅकफूटवर आले आहेत.
लायकी हा शब्द तुम्ही उच्चारला. त्यावरून ओबीसी नेत्यांनी तुमच्यावर टीका केली आहे. हा शब्द वापरला हे कुठं तरी चुकलं असं वाटतं का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांना करण्यात आला. त्यावर, तुम्ही वारंवार तो शब्द लावून धरला. मला त्याबाबत कोणीच काही विचारलं नाही. तुम्ही का लावून धरलं माहीत नाही. मी तो शब्दच मागे घेतो, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.