विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या स्वीफ्ट डिझायर कारचा समोरील टायर फुटला. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून कारमधील इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. थरकाप उडवणारी ही घटना शुक्रवारी(२२ सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास बुलढाण्याजवळ घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
कारमधील मृत तसेच जखमींची नावे कळू शकली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असणारी कार छत्रपती संभाजीनगरहून मेहकरकडे जात होती. दरम्यान, कार समृद्धी महामार्गावरील खळेगाव चॅनल नंबर ३०३ जवळ आली असता, समोरील टायर फुटल्याने अनियंत्रित झाली.काही कळण्याच्या आत कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात कारमधील एकजण जागीच ठार झाला. तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले. दररम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.
समृद्धी महामार्गावर अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत लहान-मोठे ७२९ अपघात झाले असून त्यापैकी ४७ अपघात जीवघेणे ठरले आहेत. या ४७ अपघातात १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर ९९ अपघातात २६२ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.