Wednesday, June 25, 2025

Ahmednagar crime :महिला सरपंचासह कुटूंबियांना वाळू तस्करांकडून जिवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर -नेवासा तालुक्यातील जैनपूरच्या महिला सरपंच व तिच्या पतीस वाळू तस्करांनी जातीवाचक शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने मारहाण केली. पतीला वाळूच्या डम्परने धडक देऊन तर मुलाच्या अंगावरुन कार नेत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी, जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सरपंच शैला किशोर शिरसाठ (वय 32) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, आमच्या गावच्या गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा बंद करण्याचा ठराव ग्रामसभेने मंजूर केलेला आहे. तरीही नेवासा येथील कृष्णा परदेशी व इतर हे अवैध वाळू उपसा करत असताना आम्ही त्यांना याबाबत समज दिलेली आहे. 25 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता कृष्णा परदेशी व त्याचे साथीदार नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करुन 4 डम्पर व दोन ट्रॅक्टरमधून घेऊन जात असताना पती किशोर शिवाजी शिरसाठ यांनी ही वाहने अडविली. त्यावेळी कृष्णा परदेशी याच्या अंगावर गाडी घालून ठार मारा अशी धमकी देऊन गाडी अंगावर घालू लागला. त्यावेळी मी व माझी सासू तसेच मुलगा गाड्यांना आडवे झालो तेव्हा पती किशोर शिरसाठ याचे अंगावर डम्परची धडक देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

वाळूची वाहने त्यांनी पळवून नेली. त्यावेळी कृष्णा परदेशी, पप्पू परदेशी, गणेश परदेशी, विकी परदेशी, बंटी परदेशी व गोट्या ड्रायव्हर (नाव माहित नाही) हे तिथेच थांबून शिवीगाळ करत होते. त्यावेळी गावातील लोक गोळा झाले असता कृष्णा परदेशी याने फोन करुन 15 ते 20 अनोळखी इसम बोलावून घेतले. नदीतून वाळू उपसा करु नका असे सांगत असताना कृष्णा परदेशी व त्याच्या सोबतच्यांनी लाकडी दांडक्याने मला तसेच माझे पती किशोर परदेशी यांना मारहाण केली. पप्पू परदेशी व गणेश परदेशी यांनी दगड उचलून फेकून मारले. आमच्या गावातील लताबाई चकोर, दत्तू आव्हाड, यश शिरसाठ, पल्लवी शिरसाठ, शिवाजी गिते, भाऊलाल डहारे यांना मारहाण केल्याने ते जखमी झाले.
त्यानंतर कृष्णा परदेशी याने त्याच्या ताब्यातील कार भरधाव माझा मुलगा यश याच्या अंगावर घातली. त्याच्या पायावरुन गाडीचे चाक गेल्याने तो जखमी झाला. त्यानंतर त्याने जातीवाचक शिवीगाळ केली.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी कृष्णा परदेशी, पप्पू परदेशी, गणेश परदेशी, विकी परदेशी, बंटी परदेशी व गोट्या ड्रायव्हर आदींवर गुन्हा रजि. नं. 504/2024 भारतीय दंड विधान कलम 307, 337, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1) (आर)(एस), 3(2)(व्ही) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कृष्णा पुनमसिंग परदेशी व गणेश पुनमसिंग परदेशी यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles