ज्या ग्रामपंचायतीत अनेक वर्षे पाणीपुरवठा विभागात शिपाई म्हणून काम केले, त्याच ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून काम करण्याचा मान एका व्यक्तीला लाभला आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी गाव तसे संगमनेर तालुक्यात असले तरी विधानसभेला राधाकृष्ण विखे यांच्या राहता विधानसभा मतदारसंघात येते. या आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये नामदेव किसन शिंदे हे पाणीपुरवठा विभागात शिपाई म्हणून गेली 40 वर्षे काम करत होते. मात्र, यंदा आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण पडले आणि त्यामुळे साहजिकच या प्रवर्गात येत असल्याने नामदेव शिंदे यांना गावातील नागरिकांनी सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहण्याचा आग्रह केला\
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे नामदेव शिंदे यांनी ग्रामपंचायतीतील नोकरीचा राजीनामा देत त्याच ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात प्रणित अमरेश्वर ग्रामविकास मंडळाकडून नामदेव शिंदे यांनी आपली उमेदवारी दाखल केला.
निवडणूक निकालानंतर नामदेव शिंदे हे आश्वी बुद्रुक गावचे सरपंच झाले. ज्या ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून काम केलं, त्याच ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच म्हणून बसण्याचा मान त्यांना आता मिळाला आहे.
निकालानंतर स्वतः आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरपंच झालेल्या नामदेव शिंदे यांचा सत्कार करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या