कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती आणि तर महायुतीकडून खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. एकीकडे शाहू महाराजांना शह देण्यासाठी महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणी केली असतानाच शिंदे गटाचे खासदार आणि कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपतींबाबत केलेल्या एका विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोल्हापूरचे शिंदे गटाचे खासदार आणि लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे.’, असे वक्तव्य संजय मंडलिक यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगल्या आहेत. संजय मंडलिक यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी निषेध केला आहे तर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.