महायुती सरकारने आणलेली योजना लाडक्या बहिणींसाठी नसून विधानसभेत मतं विकत घेण्यासाठी आहे, अशी खरमरीत टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. अजित पवार बारामतीतून पराभूत होतील. लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतील, असा टोलाही संजय राऊत यांनी हाणला. ते छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर पत्रकारपरिषदेत बोलत होते.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर जोरदार टीका केली. महायुतीने लाडकी बहीण योजना चांगल्या हेतूने आणली नाही. ही योजना फक्त विधानसभा निवडणुकीत मते विकत घेण्यासाठीच आणण्यात आली आहे. पण लाडक्या बहिणी लाचार नसून त्या आगामी विधानसभेत तुमचा पराभव करतील, असंही राऊत म्हणाले.
“फुटीर आमदारांना 50 कोटी आणि खासदारांना 100 कोटी दिले. पण लाडक्या बहिणीच्या खात्यावर फक्त 1500 रुपये जमा करण्यात येत आहे. महायुतीला पाठिंबा देणाराच आमदार महिलांच्या खात्यातून पुन्हा पैसे परत घेण्याची भाषा करतो. हे पैसे तुमच्या खिशातील नसून सर्वसामान्यांनी भरलेल्या करातील आहे”, असा संताप देखील संजय राऊत यांनी व्यक्त केला.”ज्यांनी महिलांच्या खात्यातून 1500 रुपये परत घेण्याची भाषा केली. त्यांची मानसिकता तपासावी लागेल. आधी त्यांची पत्नी पराभूत झाली आता पतीचा पराभूत होण्याचा नंबर आहे”, अशी टीकाही संजय राऊत यांनी नाव न घेता आमदार रवी राणा यांच्यावर केली. आमचं सरकार सत्तेत आलं तर 1500 रुपयांत वाढ करू, असं आश्वासनही संजय राऊत यांनी दिलं.
गेल्या 3 वर्षांपासून महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. 14 महापालिकेवर सध्या प्रशासक असून सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी लगावला. लोकसभेच्या सर्वे अनुकूल नव्हता महाराष्ट्राचा सर्वे देखील अनुकूल नाही. पण तरीही राज्यात पुन्हा ठाकरे २ सरकार येणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असंही राऊतांनी ठामपणे सांगितलं.