मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आमदार अपात्रताबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत अमित शाह यांच्याशी त्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदे म्हणतात की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा मुख्यमंत्री आहे. बाळासाहेबांचा स्वाभिमानी शिवसैनिक आहे, असं बोलणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांचं दिल्लीने पायपुसणं केलं आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
वारंवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीला जात आहे. या सरकार दिल्लीतील पायपुसणं केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकदाच दिल्ली आणि आग्राला गेले आणि सर्व खानांना धडा शिकून आले होते. चहा पिऊ का? पाणी पिऊ का? हे विचारण्यासाठी तुम्हाला वारंवार दिल्लीत जावं लागतं. ही लाजिरवाणी बाब आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली आहे.