नीलम गोऱ्हे राहतात त्या भागात कधीही शिवसेनेचा साधा नगरसेवकही निवडून आला नाही. पक्षाने त्यांना सगळं काही दिलं तर त्या शिंदे गटात गेल्या. या गोष्टीची लाज वाटते, अशी टीका संजय राऊत यांनी केली. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
शिवसेनेने नीलम गोऱ्हे यांना पाचवेळा आमदारकी दिली. त्यांच्यात थोडीतरी नैतिकता शिल्लक असती तर त्या राजीनामा देऊन गेल्या असत्या. नीलम गोऱ्हेंना मिळालेलं वैधानिक पद हे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाले होते. पक्षाने त्यांना पाचवेळा आमदारकी आणि महिला विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले. विधानपरिषदेचं उभसभापती पद दिले.ही सगळी पदं मिळाल्यावर एखादी व्यक्ती पक्ष सोडून जात असेल तर कारण काही असो, याची मला लाज वाटते. नीलम गोऱ्हे वेगळ्या विचाराच्या असूनही शिवसेनेत आल्यानंतर पक्षाने त्यांना हवंय ते दिलं. पण चार-पाच महिन्यांसाठी पद टिकावं, यासाठी त्यांनी बेईमानी केली. नीलम गोऱ्हे राहतात तिकडे कधी शिवसेनेचा साधा नगरसेवक निवडून आला नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.