बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जातीयवादातून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जातोय. परंतु, संतोष देशमुख यांच्या भावाने धनजंय देशमुख यांनी आज याबाबत खुलासा केला. संतोष देशमुख यांची जातीयवादातून हत्या झाली नसल्याचं त्यांनी आज स्पष्ट केलं. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
धनंजय देशमुख म्हणाले, “मी आतापर्यंत २२ वर्षांत जे माझ्या घरात अन्न खातोय ते वंजारी समाजाचे शेतकरी पिकवत आहेत. जातीयवादाचा विषय असता तर त्यांचे आणि आमचे नाते एवढे वर्षे टिकले नसते. या गोष्टीची शहानिशा केली तर हा जातीयवादाचा मुद्दा नाही, हे कळेल.”
राजकारण आणि समाजकारण्यांनी येऊन आमचं सांत्वन केलं आहे, त्यांनी आम्हाला न्याय मिळावा म्हणून पाठपुरावाही केला आहे. दलित, मुस्लीम, वंजारी बांधव येऊन गेले. येथे जातीवादाचा मुद्दा नाही. ही असुरी प्रवृत्ती आहे. समाजात विचारांचा दर्जा खालवला आहे. या प्रकरणाला जातीयवादाचं स्वरुप देऊ नका”, असं धनजंय देशमुख म्हणाले.
दरम्यान,बीड जिल्ह्यातील दोन आमदारांना मंत्रिपदे मिळाली आहेत. जिल्ह्यात दोन मंत्री असल्याने या प्रकरणी न्याय मिळण्याकरता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, असाही प्रश्न धनंजय देशमुख यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “ते काय न्याय देतात हे पाहू. ते काय मुद्दे मांडतात हे पाहण्याकरता थांबूया.”