काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची सत्यपाल मलिक यांनी रोखठोक उत्तरं दिली. पुलवामा, शेतकरी आंदोलन, जातनिहाय जनगणना, मणिपूर हिंसाचार यांवरचे प्रश्न राहुल गांधींनी सत्यपाल मलिक यांना विचारले. तसंच सत्यपाल मलिक या मुलाखतीत म्हणाले लोकसभा निवडणुकीला सहा महिने उरले आहेत. अशात मी लेखी द्यायला तयार आहे की आता मोदी सरकार येणार नाही.
RSS च्या विचारधारेबाबत काय वाटतं? मला वाटतं की भारताच्या राजकारणात दोन विचारधारा आहेत. एक गांधी विचारधारा आणि दुसरी RSS ची विचारधारा. एक अहिंसा आणि बंधुभाव सांगणारी विचारधारा आहे. तर दुसरी विचारधारा हिंसेवर आणि तिरस्कारावर बेतलेली आहे. तुमचं मत काय? असं राहुल गांधींनी विचारलं. त्यानंतर मलिक म्हणाले, “माझा विचार असा आहे की देशाला आता लिबरल हिंदुत्वाची गरज आहे आणि तो दृष्टीकोन महात्मा गांधींचा होता. त्यासाठी त्यांनी खेड्याकडे चला हा मंत्रही दिला होता. जर आपला देश या विचारधारेवर चालला तरच व्यवस्थित गोष्टी पुढेही घडतील. अन्यथा देशाचे आणखी तुकडे होण्याची भीती नाकारता येत नाही. महात्मा गांधींचा विचार हा देश जोडणारा आणि बंधुभाव जपणारा विचार होता. आज त्याच विचाराची गरज देशाला आहे.” असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे.