दूध काढणी यंत्र व मुक्त संचार गोठा या दोन योजनांसाठी
जिल्ह्याच्या 14 तालुक्यातील 208 लाभार्थ्यांची निवड
अहमदनगर दि. 3 ऑगस्ट :- जिल्हा परिषद सेस निधी सन 2024-25 मध्ये पशुसंवर्धन विभागाअंतर्गत दूध काढणी यंत्र व मुक्त संचार गोठा या दोन योजनांसाठी जिल्ह्याच्या 14 तालुक्यातील 208 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीच्या बैठकीत पशुपालकांना दूध काढणी यंत्रासाठी 60 टक्के प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देणारी व पशुपालकांना पशुधनाकरिता मुक्त संचार गोठा तयार करण्यासाठी प्रोत्साहनपर 50 टक्के अनुदानाचा लाभ देणाऱ्या दोन योजनांची प्राप्त पात्र अर्जदारांपैकी ईश्वर चिठ्ठी काढून लाभार्थी निवड करण्यात आली.
जिल्ह्यातून दूध काढणी यंत्रांसाठी एकूण 2 हजार 313 पात्र अर्ज प्राप्त झाले होते तर मुक्त संचार गोठा योजनेसाठी 3 हजार 464 पात्र अर्ज प्राप्त झाले होते. दूध काढणी यंत्रांसाठी 20 लक्ष रुपये निधीमधून एकूण 133 लाभार्थ्यांची तर मुक्त संचार गोठा योजनेसाठी 15 लक्ष रुपये निधीमधून 75 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड करताना ३ टक्के अपंग, 30 टक्के महिला अर्जदारांना प्राधान्य देण्यात आले.
निवड प्रक्रियेवेळी जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व सर्व तालुक्यांचे पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते.