अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

0
51

पाथर्डी : श्री क्षेत्र मोहटा देवस्थानच्या पासष्ट कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन व भत्ते देण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेत कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाचे चांगले गिफ्ट दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या जानेवारी महिन्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

मोहटा देवस्थानमध्ये मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी २०१९ साली अहिल्यानगर येथील कामगार न्यायालयात सातव्या वेतन आयोगाप्रमाणे कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते देण्याबाबत मागणी केली होती, तर याच विषयावर कर्मचाऱ्यांनी मार्च २०२४ मध्ये उपोषण करून वेळोवेळी याबाबत देवस्थान समितीकडे पाठपुरावा केला होता.

या विषयावर नुकतीच देवस्थान समितीचे चेअरमन तथा जिल्हा सत्र न्यायाधीश महेश लोणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस विश्वस्त तथा उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, ॲड. कल्याण बडे, शशिकांत दहिफळे, विठ्ठल कुटे, अक्षय गोसावी, बाळासाहेब दहिफळे, ॲड. विक्रम वाडेकर, डॉ. श्रीधर देशमुख, श्रीराम परतानी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे आदी उपस्थित होते.

या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या विषयावर चर्चा करण्यात आल्यानंतर सातवा आयोग कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा ठराव संमत करण्यात येऊन मानधनावर काम करणारे ४८ कर्मचारी, तर सहाव्या वेतन आयोगानुसार काम करणारे १७ कर्मचारी अशा ६५ कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या जानेवारीपासून सातव्या आयोगानुसार वेतन व भत्ते लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या शिवाय सेवाज्येष्ठता ही कर्मचाऱ्यांच्या ज्या तारखेपासून पीएफ कपात करण्यात आला, त्या तारखेपासून धरण्याचा, तसेच मागील सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याला १,२१,००० रुपये देखील देण्याचा निर्णय घेण्यात आला. ठराव संमत होताच कर्मचाऱ्यांनी देवस्थान समितीचे आभार मानत आनंदोत्सव साजरा केला.