नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. या लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु झालं आहे. आज सोमवारी सकाळी नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएम मशीनला हार घातला. त्यानंतर आता नाशिकमधील मतदान केंद्रात शांतिगिरी महाराजांच्या नावाने चिठ्ठ्या वाटप झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी महाराजांच्या नावाने चिठ्ठ्या वाटप करणाऱ्या शांतिगिरी महाराजांच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. शांतिगिरी महाराजांनी सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडून पाठिंबा मिळाल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज शांतिगिरी महाराज मतदानासाठी मतदानकेंद्रावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनला हार घातला.
या प्रकारामुळे शांतिगिरी महाराज यांच्याविरोधात तक्रार दाखल होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर आता शांतिगिरी महाराजांच्या सहकाऱ्याने मतदान केंद्रावर त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या वाटप केल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शांतिगिरी महाराज यांच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतलं आहे.
शांतिगिरी महाराजांच्या सहकाऱ्याने त्यांच्या नावाने चिठ्ठ्या वाटप केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. मतदान केंद्रावर महाराजांच्या नावाने चिठ्ठ्या वाटप केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी जनेश्वर महाराजांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू केली आहे