पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची ५ जानेवारी २०२४ ला कोथरूडमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन वकिलांसह ८ आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहेत.
दरम्यान, मोहोळ हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच पोलीस चौकशीत आतापर्यंतची मोठी माहिती समोर आली आहे. दोन्ही आरोपी वकिलांना शरद मोहोळ याच्या खुनाची माहिती होती, असे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी गुरुवारी (११ जानेवारी) न्यायालयात सांगितलं आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देखील मोहोळ याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, तो यशस्वी ठरला नाही.
त्यासाठी या गुन्ह्यातील इतर आरोपींची दोन्ही आरोपी वकिलांबरोबर बैठक झाली होती, असंही पोलीस तपासात समोर आलं आहे. ॲड. संजय उढाण याचे एका आरोपीबरोबर खून करण्यापूर्वी संभाषण झालं होतं. मोहोळ याचा खून करण्यासाठी वटकर आणि शेडगे यांनी मध्यप्रदेशमधून शस्त्रे मागविली आणि इतर आरोपींनी दिल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं आहे.आरोपींनी एकूण चार शस्त्रे मागविली होती. त्यातील तीन शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. आणखी काही शस्त्रे पुरविली आहेत का? याचाही शोध घेण्यात येत आहे, असं सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयास सांगितलं आहे.
आरोपी नेमके कुठे भेटले? त्यांच्यासोबत आणखी काहींचा यात समावेश आहे का? या गुन्ह्यातील मास्टरमाइंड कोण आहे? याचा तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. त्यानुसार, न्यायालयाने दोन्ही आरोपी वकिलांना न्यायालयीन तर नव्याने अटक केलेल्या दोन आरोपींना ७ दिवसांची कोठडी सुनावली आहे.