कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्या प्रकरणात दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केली.विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे यांच्यासह १० जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केली आहे. शेलार आणि मारणे यांचा शरद मोहोळच्या हत्येचा कट रचण्यात सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
शरद मोहोळच्या हत्येनंतर हे सर्व आरोपी पनवेल आणि वाशी भागात लपून बसले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रात्री लपलेल्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पनवेल पोलिसांची मदत घेण्यात आली. या सर्व आरोपींना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
शरद मोहोळ हत्या प्रकरणी शनिवारी आणखी ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्याआधी १० आरोपी अटकेत होते. त्यानंतर आज १० आरोपींना अटक करण्याता आली आहे. अशारितीने आतापर्यंत एकूण २३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.