बीड : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर विचार विनिमय करण्यासाठी शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या लवादाची बैठक ४ जानेवारीला शिर्डीत होत आहे. या बैठकीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ऊसतोड कामगारांच्या मजुरीत दरवाढ करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील ऊसतोड कामगार संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर साखर संघ आणि कामगार संघटनांची नुकतीच बैठक झाली होती. कामगारांच्या मजूरीत २९ टक्के दरवाढ करण्याची तयारी साखर संघाने दाखवली आहे. तर, ही दरवाढ ४० टक्के असावी यावर ऊसतोड कामगार संघटना ठाम राहिल्या आहेत, त्यामुळे यावर कोणताही तोडगा निघू शकला नव्हता. ५ जानेवारीपर्यंत तोडगा न निघाल्यास कोयता बंद आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनांनी दिला आहे.
दरम्यान, मजूरांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या लवादाने घ्यावा यावर साखर संघ व ऊसतोड मजूर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं एकमत झालं होतं. त्या अनुषंगाने येत्या गुरूवारी ४ जानेवारी रोजी शिर्डी येथे पवार-मुंडे लवादाची बैठक होणार आहे. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील ऊसतोड कामगारांचं लक्ष शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या बैठकीकडे लागले आहे. राज्यातील ऊसतोडणी मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगारांकडून केली जाते. राज्यातील विविध भागात बीड, अहमदनगरच्या काही तालुक्यातील ऊसतोडणी कामगार राज्यातील विविध भागांमध्ये ऊस तोडणीसाठी जात असतात. त्यांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं.