काल छत्रपती संभाजीनगरमध्ये काही जुनी माणसं त्यांनी पुन्हा त्यांच्या गोटात घेतली. पण त्याचवेळी त्यांनी नासक्या आंब्यावर सर्जिकल स्ट्राईकचा इशारा दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा कुणावर रोख आहे, यावरुन सध्या चर्चा रंगली आहे.
दरम्यान पक्षाच्या मेळाव्यात शरद पवार यांच्या भाषणाने भविष्यातील राजकीय घडामोडींची नांदी समोर आणली. त्यांच्या भाषणात अनेकांना चिमटे तर होतेच पण गद्दारांना पक्षात स्थान नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर भविष्यात पण अशा माणसांना बाजूला करण्यात येईल, याचेच स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
आमच्यापासून दूर गेलेले काही सहकारी विचारांनी सोबत होते. ते आता परत येत आहेत. तेव्हा काहींना मला असे सहकारी परत पक्षात घेताना सावधगिरीचा सल्ला दिला. तुम्ही त्याची काळजी करु नका. आंब्याची आढी आहे, त्या आढीत सर्व आंबे चांगले आहेत. एखादा आंबा नासका असल्यास सर्व आढी खराब होते. मी ती आढी कधी खराब होऊ देणार नाही. ती आढी नीटच राहणार आणि नासका असेल तर त्या आंब्याला खड्यासारखं बाहेर काढणार असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.
शरद पवार यांच्या या वक्तव्याची राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. पवारांनी यापूर्वीच्या घटनेचा आधार घेत आता सावधगिरी घेत असल्याचे आणि कुणी पक्षाविरोधात जात असेल तर त्याला खड्यासारखं बाजूला करण्याचे हे संकेत दिले आहेत.