राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांचा कुणबी जातीचा दाखला दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर खुद्द शरद पवार यांनी सांगितले होते की माझी जात सर्वांना माहिती असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांनी आता ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणा द्यावी अशी उपरोधिक टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या जातीचा उल्लेख असलेले काही कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरून उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. दिवाळीच्या दरम्यान, पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी सगळ्या देशाला माझ्या जातीबाबत माहित असल्याचे म्हणत अधिक भाष्य केले नाही.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले की, शरद पवार म्हणाले की, मी कधीच जातीचे राजकारण केलं नाही. माझी जात लोकांना माहिती आहे असेही पवारांनी म्हटले. मात्र, याच गोष्टीवर आम्हाला आक्षेप असून त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी विखे पाटील यांनी केली. शरद पवार यांनी एकदा गर्वाने सांगावे की ‘गर्व से हम मराठा’ आहे. एकदा घोषणा देऊन टाकावी. एक मराठा लाख मराठा ही घोषणाही द्यावी, म्हणजे तो प्रश्न संपून जाईल असेही विखे-पाटील यांनी म्हटले.