उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता. निवडणूक आयोगानेदेखील अजित पवार यांचाचा गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निकाल दिला. त्यानंतर आता शरद पवार नेमकं काय करणार? लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना नव्या निवडणूक चिन्हाला लोकांपर्यंत कसे नेणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याच आव्हानावर शरद पवार यांनी सविस्तर भाष्य केले आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीबद्दल बोलताना त्यांनी लढवलेल्या पहिल्या निवडणुकीवर संदर्भ दिला. ते आज (११ फेब्रुवारी) पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
पक्ष आणि चिन्ह गेलं आहे. नवे कोणते चिन्ह मिळण्याची तुम्हाला अपेक्षा आहे. हे नवे चिन्ह लोकांपर्यंत कसे घेऊन जाणार? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीचे उदाहरण दिले. माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की, मी पहिली निवडणूक बैलजोडी या निवडणूक चिन्हावर लढवली होती. त्यानंतर आमचं चिन्ह गेलं होतं. त्यानंतर आम्ही चरखा या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली. तेही चिन्ह गेलं होतं. त्यानंतर आम्ही हाताचा पंजा या चिन्हावर लढलो होतो. आमचं तेही चिन्ह गेलं होतं. त्यानंतर मी घड्याळ या निवडणूक चिन्हावर लढलो. त्यामुळे लोकांच्या दृष्टीने विचार हा महत्त्वाचा असतो. चिन्ह हे मर्यादित कामासाठी उपयुक्त असते, असे शरद पवार यांनी सांगितले.