राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन राष्ट्रवादीच्या दोन्हीही गटाने साजरा केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दिन मुंबईत पार पडला. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. मात्र, याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठं भाष्य केलं. त्यामुळे त्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय? यावर आता तर्कवितर्क लावले जात आहेत
“माझी तुम्हाला विनंती आहे. मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत. आता माझ्या प्रदेशाध्यक्षपदाचे चार महिने मोजू नका. मी व्यवस्थित काम करतो. पण जाहीर बोलायचं बंद करा. जाहीर ट्विटरवर बोलायचं बंद करा. काय असेल तर शरद पवारांना माझी तक्रार करा. शरद पवार आमच्या दोन कानाखाली मारतील. तो त्यांचा निर्णय आहे. मी चुकीचा वागलो तर जनतेवर परिणाम होईल. फक्त चार महिने, नोव्हेंबरनंतर मीच नमस्कार करेल. पण चार महिने आपण एकदिलाने राहू आणि काम करू, पक्षात काय करायचं ते कानात येऊन सांगा. मात्र, जाहीर बोलायचं बंद करा. खासगीत बोलायचं बंद करा. टीम म्हणून काम काय असतं ते अमोल कोल्हे, निलेश लंके, बजरंग सोनवणे या सगळ्यांना माहिती आहे. हा पक्षाचा विजय आहे”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.